विधानपरिषदेच्या पाच जागांची पोटनिवडणूक बिनविरोध   

मुंबई : विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवारच देण्यात आला नसल्यामुळे निवडणूक बिनविरोध होणार आहे. महाविकास आघाडीकडून अर्ज न भरल्यामुळे महायुतीचे पाचही उमेदवार विधानपरिषदेवर बिनविरोध निवडून जातील
 
विधानपरिषद पोटनिवडणुकीत भाजपच्या वाट्याला तीन जागा आल्या आहेत. तर, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी एक जागा लढवणार आहे. भाजपच्या तिघांची आमदारकीची मुदत मे २०२६ पर्यंत आहे. महायुतीकडून विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आलेल्या अर्जांची काल विधिमंडळात निवडणूक अधिकार्‍यांकडून पडताळणी पार पडली. यामध्ये सर्व अर्ज वैध ठरले. तर एक अपक्ष अर्ज या निवडणुकीत दाखल झाला होता; पण या अर्जावर आमदारांची स्वाक्षरी नसल्यामुळे तो बाद ठरवण्यात आला.
 
महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी भाजपकडून संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली तर शिवसेनेने चंद्रकांत रघुवंशी आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं संजय खोडके यांच्या नावाची घोषणा केली. विरोधकांकडून कोणताही अर्ज न आल्यामुळे ही निवडणूक आता बिनविरोध होणार आहे.

विधानपरिषदेची रचना

महाराष्ट्राच्या विधानपरिषदेची सदस्यसंख्या ७८ इतकी आहे. विधानसभेप्रमाणे परिषद दर ५ वर्षांनी भंग होत नाही. विधानपरिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ ६ वर्षांचा असतो. ७८ सदस्यांपैकी ३० सदस्य विधानसभेच्या आमदारांकडून निवडले जातात. २२ सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींकडून मतदानाद्वारे निवडून दिले जातात. तर, शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातून प्रत्येकी ७ आमदार निवडले जातात.
 
हे होणार विधानपरिषदेचे आमदार
१. संदीप जोशी (नागपूर, भाजप)
२. संजय केनेकर (छत्रपती संभाजीनगर, भाजप)
३. दादाराव केचे (आर्वी, भाजप)
४. चंद्रकांत रघुवंशी (नंदुरबार, शिवसेना-शिंदे गट)
५. संजय खोडके (अमरावती, राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार गट)
 

Related Articles